राजकुमार जाेंधळे / निलंगा (जि. लातूर) : गावात अवैध दारू विक्रीप्रकरणी कारवाई करण्यास लावत असल्याच्या संशायावरून शेतात झाेपलेल्या तिघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात वडिल, मुलगासह तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी निलंगा पाेलिसांनी तिघांना अटक केली असून, एक फरार आहे. अशी माहिती पाेलिस निरीक्षक बालकृष्ण शेजाळ यांनी शनिवारी दिली.
पाेलिसांनी सांगितले, लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील गौर (ता. निलंगा) शिवारात असलेला बार बंद करून, मालक-मुलगा आणि एक कामगार लगतच्या शेतात झोपले हाेते. दरम्यान, रविवार, ५ मे राेजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सहा ते सात जणांच्या टाेळीने धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला हाेता. यामध्ये बालाजी देशमुख (वय ५०), मुलगा समीर देशमुख (वय २०) आणि बारमधील कामगार गणेश कासार (वय २०) हे गंभीर जखमी झाले. यातील वेटरला गंभीर दुखापत झाली असून, घटनास्थळावर एकाचे बोट तुटून पडले. या हल्ल्यानंतर अंथरुणावर रक्ताचा सडा पडला होता.
याप्रकरणी निलंगा पाेलिस ठाण्यात अंजली बालाजी देशमुख यांच्या तक्रारीवरुन अर्जुन संभाजी कदम, नारायण अप्पाराव घारोळे, अनंत अप्पाराव घारोळे, महेश सूर्यवंशी दोरवे यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने पाच जणांना ताब्यात घेतले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, अन्य एक जण फरार झाला आहे. दोघा अल्पवयीन मुलांची लातूरच्या बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अटकेतील आराेपींच्या पाेलिस काेठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे, असे पोलिस निरीक्षक बालकृष्ण शेजाळ यांनी सांगितले.