लातूर : नेते मंडळींची विधानसभा निवडणुकीची परीक्षा ३० दिवसांवर आली असून, जनता कोणाला किती गुण देते, यावर सर्वांचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे इच्छुक आपापल्या मतदार संघात जोरदार अभ्यासाला लागले आहेत. मात्र अनेकांना परीक्षेचे हॉलतिकीट अर्थातच उमेदवारी न मिळाल्याने तिकीटासाठी मुंबई वाºया सुरू आहेत.
निलंगेकर, देशमुख, पाटील यांच्या मतदारसंघाकडे लक्ष...२०१४ च्या निवडणुकीचा निकाल एका अर्थाने महाआघाडी व महायुतीसाठी फिफ्टी- फिफ्टी राहिला आहे़ येणाºया निवडणुकीतही दोन्ही प्रमुख पक्षांकडून जोरदार ताकद लावली जाईल. भाजपाकडून राज्यात कॅबिनेट मंत्रीपद भूषविलेले पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी राज्यमंत्री आ. बसवराज पाटील हे रिंगणात असतील. त्यामुळे निलंगा, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष असणार आहे. एक विद्यमान मंत्री आणि दोन माजी राज्यमंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.लातूर जिल्ह्यात लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा, उदगीर, अहमदपूर असे सहा मतदारसंघ आहेत. पक्षीय बलाबल लक्षात घेतले तर काँग्रेसचे व भाजपाचे प्रत्येकी तीन आमदार आहेत. ज्यामध्ये अहमदपूरचे आमदार आधी अपक्ष होते आता भाजपात आहेत. काँग्रेसच्या यापूर्वी निवडून आलेल्या तीन आमदारांपैकी लातूर ग्रामीणमधून नवा चेहरा दिला जाण्याची दाट शक्यता आहे. तिथे धीरज देशमुख यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. तर भाजपाकडून लातूर ग्रामीणमध्ये रमेश कराड यांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यांनी या मतदारसंघात दोन वेळा निवडणूक लढविली आहे. त्याच वेळी भाजपाकडून प्रकाश पाटील वांजरखेडकर, शंकर भिसे यांची नावेही घेतली जात आहेत. मात्र कराड प्रबळ दावेदार मानले जातात.
इच्छुकांची गर्दी वाढल्याने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपात बंडाचा झेंडा किती जणांच्या खांद्यावर राहतो, हे ही पुढच्या काळात कळणार आहे. आ. विनायकराव पाटील यांच्यासह दिलीपराव देशमुख, गणेश हाके, अशोक केंद्रे, भारत चामे यांच्यासह अनेकांची तयारी सुरू आहे. तिथे राष्ट्रवादीकडून मात्र एकमेव बाबासाहेब पाटील प्रारंभापासून पेरणी करीत आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित आहे़ उमेदवार ठरलेला आणि प्रचाराची दिशाही ठरलेली, असे चित्र अहमदपुरात राष्ट्रवादीत आहे. औसा मतदार संघात काँग्रेसकडून आ. बसवराज पाटील यांचे नाव निश्चित आहे. तर भाजपाकडून अभिमन्यू पवार, अरविंद पाटील निलंगेकर, किरण उटगे, बजरंग जाधव ही नावे चर्चेत आहेत. तर शिवसेनेकडून माजी आ. दिनकरराव माने, संतोष सोमवंशी ही नावे समोर येत आहेत. एकंदर काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील निश्चित तर भाजपामध्ये अजूनही स्पर्धा सुरू आहे. त्यात युती झाली तर कोणता मतदारसंघ कोणाला हे त्रांगडेही राहणार आहे. उदगीर मतदारसंघात भाजपाकडून आ. सुधाकर भालेराव तर राष्ट्रवादीकडून संजय बनसोडे यांची तयारी सुरू आहे. दोन वेळा आमदार राहिलेले भालेराव हॅटट्रीकच्या तयारीला लागले आहेत. आता राष्ट्रवादीला ऊर्जा कशी मिळते याकडे लक्ष असणार आहे.
निलंग्यात काँग्रेसला आव्हान...निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली़ ते कॅबिनेट मंत्रीही झाले. केंद्रात आणि राज्यात सत्तास्थानी राहिल्याने योजना आल्या. परिणामी, लढत देताना काँग्रेसला मोठे आव्हान राहणार आहे.लातूरमध्ये भाजपाची कसोटीमनपा भाजपाच्या ताब्यात. शहरात पाण्याचा प्रश्न कायम़ रस्त्यावंर खड्डे़ त्यामुळे सत्तापक्षाच्या उमेदवाराला मतदारांसमोर जाताना मोठी कसोटी आहे. तर काँग्रेसकडून आ. अमित देशमुख सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले असून, मोदी लाटेतही त्यांचे मताधिक्य कायम होते. आता पुढे उमेदवार कोण असणार, यावरून लढाईची तीव्रता स्पष्ट होईल.
‘वंचित’कडेही लक्ष...वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य अॅड. अण्णाराव पाटील यांनी वंचितचा झेंडा मैदानावर आणलेला आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात वंचितकडून तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रमुख पक्षांकडून तिकीट न मिळालेले अनेकजण ऐन वेळी वंचितचा आधार शोधू शकतात.
बंडोबा थंडोबा होणार की मैदानात उतरणार...उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ आॅक्टोबर आहे़ काही ठिकाणच्या उमेदवाºया अगदी शेवटच्या क्षणी जाहीर करून बंड होणार नाही, याची काळजी सर्वच पक्ष घेतील़ तरीही ज्यांनी आमदारकी लढवायचीच असे ठरविले आहे, ते बंडोबा होणार की पक्षश्रेष्ठीचा आदेश ऐकूण थंडोबा होणार हे पुढच्या काही दिवसात कळणार आहे. सर्वाधिक इच्छुकांची गर्दी अहमदपूरमध्ये भाजपाकडून आहे. पक्षाचे तिकीट न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीचा आधार घेण्याची तयारीही अनेकांनी सुरू केली आहे़ त्यामुळे मैदानात कोण-कोण राहणार याकडेही जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.