कमलनगर (जि. बीदर) : एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली जवळपास ९३ लाखांची रोकड दरोडेखोरांनी गोळीबार करून पळविल्याची घटना बीदर शहरात गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला असून एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
बीदर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय व अन्य शासकीय कार्यालये असलेल्या छत्रपती शिवाजी चौकात वर्दळीच्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम आहे. याठिकाणी रोकड भरण्याचे कंत्राट असलेल्या सी.एम.एस. कंपनीकडून जीपमधून रक्कम सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आणण्यात आली होती. याच सुमारास हेल्मेट व मास्क घातलेले दुचाकी वरून दोन दरोडेखोर जीपजवळ आले. त्यांनी रिव्हाल्वरचा धाक दाखवत जीपमधील रक्कम पळविण्याचा प्रयत्न करीत असताना जीपसोबत असलेले कंपनीचे गिरी व्यंकटेश ( वय २७) व शिवकुमार (वय २८ ) यांनी प्रतिकार केला.
यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी सहा फायरिंग केले. या गोळीबारांत व्यंकटेश गिरी यांना दोन गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर शिवकुमार याच्या हृदयाजवळ गोळी लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथे हलविण्यात आले आहे. दरोडेखोरांनी जवळपास ९३ लक्ष रुपये लुटल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनास्थळी खासदार सागर खंड्रे, आ. डॉ. शैलेंद्र बेल्दळे, आयजी अजय हिलोरी व पोलिस अधीक्षक प्रदीप गुंटी यांनी भेट देऊन पाहणी केली.
हेल्मेट, मास्क लावलेले दरोडेखोर...
बीदर शहराच्या अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकीवर आलेल्या दोन दरोडेखोरांनी डोक्यावर हेल्मेट, तोंडाला मास्क लावले होते. त्यांनी रिव्हॉल्वरमधून सहावेळा फायरिंग केले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अत्यवस्थ एकाला हैद्राबाद येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.