लातूर : एका अलपवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आरोपीला २० वर्षाची सक्तमजुरी व एक हजाराचा दंड अशी शिक्षा लातूर येथील जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश बी. सी. कांबळे यांनी सुनावली आहे.
लातूर न्यायालयाचे विशेष वकिल अँड. मंगेश महिंद्रकर यांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलीचे लग्न सातारा जिल्ह्यातील तरुणाशी झाले होते. दरम्यान, मुलीचे पोट दुखत असल्याने रूग्णालयात तपासणी करण्यात आली. ती सहा महिन्याची गरोदर असल्याचे उघड झाले. अधिक चौकशी केली असता, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा लतुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
यामध्ये पोलिस उपनिरीक्षक गणेश कदम यांनी तपास करून लातूर जिल्हा व सत्र न्यायालय दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदारांची साक्ष महतत्वपूर्ण ठरली. शिवाय, पुरावा म्हणून दाखल केलेल्या कागदत्रांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाला. पीडितेचा जबाब, तिच्या वयाचा पुरावा, वैद्यकीय अधिाऱ्यांनी दिलेले पुरावे, तपास करणाऱ्या पोलिसांचा जबाब आणि पुरावा आरोप सिद्ध करण्यासाठी महत्वाचा ठरला. या पुराव्याच्याआधारे विशेष न्यायाधीश बी. सी. कांबळे यांनी आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यासह अन्य कलमान्वये २० वर्ष सक्तमजुरी आणि एक हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने वकील मंगेश महिंद्रकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांना ॲड. महादेवी गवळी, ॲड. सोनाली बडवणे कांकाळ यांनी काम पाहिले. तर पैरवी पोलिस अमलदार माने यांनी केली.