लातूर : निलंगा तालुक्यातील उमरगा (हाडगा) येथील विद्यार्थ्यांनी बस थांबविण्यासाठी लातूर- तुपडी- निलंगा एसटी बसला हात केला. मात्र, चालकाने विद्यार्थ्यांच्या अंगावर एसटी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त विद्यार्थी व पालकांनी शुक्रवारी सकाळी १० वा. एसटी अडवून दोन तास रास्तारोको आंदोलन केले.
निलंगा- उमरगा- हाडगा- तुपडी- राठोडा येथील विद्यार्थी शिक्षणासाठी निलंग्याला जातात. परंतु, या मार्गावर बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील नागरिक व पालकांनी निलंग्याच्या आगारप्रमुखांना वारंवार तोंडी, लेखी तक्रारी केल्या. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही.
शुक्रवारी सकाळी १० वा. उमरगा हाडगा येथे लातूर- निलंगा ही तुपडी मार्गे जाणारी बस आली. तेव्हा विद्यार्थ्यांनी बस थांबविण्यासाठी हात दाखविला. मात्र, चालकाने विद्यार्थ्यांचा अंगावर बस घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त विद्यार्थी, पालक व प्रवाशांनी रास्तारोको आंदोलन करीत एसटीच्याविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. या मार्गावर ज्यादा बसेस सोडाव्यात. उमरगा हा. येथे बस थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
निलंगा आगाराच्या दुर्लक्षामुळे केळगाव मार्गे बसपूर- निलंगा ही बस बंद करण्यात आली आहे. तसेच राणी अंकुलगा ही बस वेळेवर धावत नाही. दरम्यान, रास्तारोको आंदोलन पाहून निलंग्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गावातील विलास लोभे, जगदीश लोभे, नयन माने, अजित लोभे यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
पाटीच्या ठिकाणी बस थांबवा...निलंगा आगाराची बस उमरगा हाडगा पाटीवर थांबत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहेत. यासंदर्भात आगार प्रमुखांना वेळोवेळी निवेदन देऊनही दुर्लक्ष होत आहे.
-विलास लोभे, ग्रामस्थ, उमरगा हा.