लातूर : बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका महिला लिपिकाने वरिष्ठ लिपिकाच्या छळाला कंटाळून केंद्राच्या आवारातच विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. लोभा गणेश कांबळे हे त्या पीडित महिलेचे नाव असून शुक्रवारी दुपारच्या वेळी घडलेल्या या घटनेने शिस्तप्रिय खाकीतील शोषणाच्या कथा चव्हाट्यावर आल्या आहेत. लातूर येथील बाभळगाव परिसरात पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात लोभा गणेश कांबळे (३६, रा़ प्रकाशनगर, लातूर) या २००८ पासून लिपीक म्हणून सेवेत आहेत. काही वर्षांपूर्वी तिथे चंद्रकांत जाधव नावाचे वरिष्ठ लिपीक रुजू झाले होते. दरम्यान, तेव्हापासून आजपर्यंत कांबळे यांना विनाकारण छळ करण्यास सुरुवात केली, अशा आशयाची तक्रार पीडित महिलेने वरिष्ठांकडे केली होती. मात्र पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.शुक्रवारी कांबळे यांना मुंबईच्या प्रशिक्षण व खास पथके विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक विजयसिंह जाधव हे येणार असल्याची माहिती मिळाली़ त्यामुळे त्या शुक्रवारी सकाळी दोन शासकीय विश्रामगृहावर भेटून आपली व्यथा मांडण्यासाठी गेल्या होत्या़ मात्र, तिथे त्यांची भेट न झाल्याने अखेर बाभळगावच्या पोलीस मुख्यालयात गेल्या़ दरम्यान, मात्र, तिथे त्यांना पोलीस उपमहानिरीक्षकांना भेटण्यास टाळाटाळ करण्यात येत होती़ अखेर कांबळे यांनी भेट घेतली़ परंतु, पोलीस उपमहानिरीक्षकांनी तुमची चौकशी ही येथील पोलीस अधिकाऱ्यांमार्फतच होईल़ त्यामुळे तुमच्या विरोधातच हा अहवाल असे सुनावल्याने पिडीत कांबळे यांनी सांगितले़त्यामुळे संतप्त झालेल्या कांबळे यांनी तिथेच विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले़ सायंकाळपर्यंत अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते़ रात्री त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आल्याचे पाहून डॉक्टरांना वॉर्ड १२ मध्ये हलविले आहे़ यासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता पोलीस खात्यातीलच बेशिस्तीचे आणि छळाचे प्रकरण आल्याने अधिकारीही बुचकळ्यात पडले आहेत. प्रकृती अस्वास्थ्याअभावी उपचार सुरु असल्याने रात्री उशिरापर्यंत पीडित महिलेचा जबाब घेता आला नाही. त्यामुळे उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. वरिष्ठांकडे तक्रार करुनही माझी दखल घेतली गेली नाही ! माझ्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत मी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली. पण वरिष्ठांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही याचे दु:ख वाटते, अशी प्रतिक्रिया लोभा कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पतीच्या निधनानंतर अनुकंपाखाली लागल्या नोकरीस़़़लोभा कांबळे यांचे पती गणेश कांबळे हे पोलीस दलात कर्मचारी म्हणून कार्यरत होते़ मात्र, त्यांचे आकस्मित निधन झाल्याने त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर सन २००८ मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या होत्या़
वरिष्ठाच्या छळाला कंटाळून पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिला लिपिकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2017 8:34 PM