लातूर : पीकविमा यादीत नावे असूनही अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. ज्यांना भरपाई मिळाली ती तोकडी आहे, असे म्हणत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी निलंगा येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना थांबविले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.
ई- पीक पाहणी ऑनलाईनऐवजी तलाठी अथवा कृषी सहाय्यकांकडून करुन पिकांचे पंचनामे करावेत. शेतकऱ्यांची दिशाभूल करुन मसलगा मध्यम प्रकल्पातील पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी सोमवारी सकाळी निलंगा येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात पोहोचले. या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुरु केला. तेव्हा पोलिस निरीक्षक बी.आर. शेजाळ तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अरुण महापुरे यांना देण्यात आले.
निवेदनावर छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे, तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, कार्याध्यक्ष अंकुश शेळके, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, तालुका उपाध्यक्ष हनुमंत पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समज देऊन सोडून दिले.