रेणापूर : तालुक्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्यातील सुरक्षा, इलेक्ट्रिशियन विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील १५ महिन्यांपासून पगार थकला आहे. कारखाना प्रशासनास वारंवार विनंती करुनही पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी कारखान्याच्या गेटसमोर अंगावर डिझेल, पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी रेणापूर पोलिसांनी २२ कर्मचाऱ्यांना रोखत ताब्यात घेतले.
पन्नगेश्वर साखर कारखान्यातील सुरक्षा, इलेक्ट्रिशियन विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील १५ महिन्यांपासून पगार थकले आहेत. त्यामुळे पगार करावा, भविष्य निर्वाह निधी जमा करावा, या प्रमुख मागणीसाठी कामगारांनी २५ सप्टेंबर रोजी कारखाना प्रशासनास निवेदन दिले होते. परंतु २१ दिवस उलटून ही मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सामूहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याकडे कारखाना प्रशासनाकडून कानाडोळा केल्याने सोमवारी सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर अंगावर पेट्रोल आणि डिझेल ओतून घेत सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलन करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी रेणापूरचे पोलिस निरीक्षक ए.ए. अनंत्रे, पोलिस उपनिरीक्षक एल.बी. बोईनवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. एस. कांदे, पोलिस हेडकाॅन्स्टेबल आनंद कांबळे, नामदेव सारोळे, अनंत बुधोडकर, पी. टी. शेळगे यांंची उपस्थिती होती.