चाकूर : शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी मागितला होता. मात्र, या कालावधीत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे तातडीने मराठा आरक्षण द्यावे, या मागणीसाठी चाकूर शहरातील चार युवकांनी जुने बसस्थानक येथे सोमवारी दुपारी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी सतर्कता दाखवित या तरुणांना ताब्यात घेतले.
मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असून, सरकारने मागवून घेतलेली ३० दिवसांची मुदत संपली तरी काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शहरातील वैभव गोविंद धोंडगे, शहाजी अंकूशराव शिंदे, नवनाथ चंद्रशेखर बिरादार व कृष्णा शत्रूघ्न धोंडगे या चार युवकांनी सोमवारी दुपारी जूने बसस्थानक येथे अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, याप्रसंगी पोलिसांनी तत्परता दाखवित चौघा जणांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस निरिक्षक साहेबराव नरवाडे, पोलिस उपनिरिक्षक राजाभाऊ घाडगे, तुकाराम फड, कपील पाटील, दिलीप मोरे, पोहेकॉ अनिल श्रीरामे, सुनील बोडके, योगेश मरपल्ले आदींची उपस्थिती होती.