औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नरसिंग बिरादार यांची, उपसभापतीपदी शाहुराज थेटे तर गटनेतेपदी व्यापारी प्रतिनिधी निर्भय पिचारे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीची नुकतीच निवडणूक झाली असून भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. दरम्यान, सभापती व उपसभापती पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडीसाठी गुरुवारी बाजार समितीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी रवी गडेकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी सभापतीपदी नरसिंग बिराजदार यांची तर उपसभापती शाहुराज थेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच यावेळी नवीन पद निर्माण करण्यात येऊन गटनेते पदी व्यापारी प्रतिनिधी निर्भय पिचारे यांची निवड करण्यात आली.
यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, नूतन संचालक संजय दाेरवे, राम काळगे, अनंत बाेंडगे, तुकाराम पाटील, वाघजी पाटील, नागनाथ स्वामी, व्यंकट बिरादार, शाहुराज पाटील, धनराज माने, रंजना शिंदे, अर्चना गवंडगावे, कालिदास रेड्डी, सुरेश बिरादार आदी उपस्थित हाेते. या निवडीनंतर नूतन सभापती, उपसभापती, गटनेता व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रवी गडेकर, प्रभारी सचिव सतीश मरगणे आदी उपस्थित हाेते.
यावेळी अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समिती एक आदर्श बाजार समिती निर्माण करू. तसेच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून देण्याबरोबरच बाजारात आवश्यक त्या सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करु.