निलंगा : तालुक्यातील औराद शहाजानी गावाचा परिपूर्ण विकास व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू झाल्या असून, प्रशासकीय कामकाजासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर पाठपुरावा करीत आहेत.
औराद शहाजानी हे महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील ३० हजार लोकसंख्येचे गाव असून, येथे कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत ६८ गावांचे कार्यक्षेत्र येते. कापड, वैद्यकीय, दाल मिल, ऑइल मिल, खते-बियाणे, मशिनरी, हार्डवेअर, सराफा, बँका यासह लघुउद्योग येथे आहेत. औरादमध्ये वर्षाकाठी जवळपास ७०० कोटी रुपयांची उलाढाल होते.
गावात ५० शैक्षणिक संकुले असून, प्राथमिक आरोग्य केंद्र, भूकंप मापक तसेच हवामान केंद्र, जलसिंचन, महावितरण, टपाल विभाग, महसूल विभागाची कार्यालये आहेत. सद्यस्थितीत १७ ग्रामपंचायत सदस्य असून, गावाच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात निधी येत नाही. त्यामुळे नगरपंचायत करावी, अशी मागणी होती. यापूर्वीही २२ व्यापारी संघटनांनी औरादला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती.
विधानसभेसह मुख्यमंत्र्यांकडे नगरपंचायतीसाठी मागणी...औराद शहाजानी गावाचा वेगाने होणारा विस्तार पाहता भाैतिक सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायतीला अडचणी येत आहेत. त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करून औराद शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची माहिती लवकर शासनाकडे सादर करावी, असे नगर विकास विभागाच्या उपसचिव यांनी जिल्हाधिकारी, पंचायत समिती व नगररचना विभागास पत्राद्वारे कळविले आहे.
ग्रामपंचायत बैठकीत ठराव घेण्यात येणार...गावहद्द व सर्व्हे नंबर, नकाशा याचा आराखडा तयार करण्यात आला असून, लवकरच वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याचे तलाठी बालाजी भाेसले यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायतचा ठराव बैठक घेण्यासाठी दोन दिवसात सदस्यांची बैठक घेऊन ठराव दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी राजेश गिरी यांनी सांगितले.