औराद शहाजानी (जि. लातूर) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या औराद शहाजानी परिसरात शुक्रवारपासून कमाल तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते. मात्र, साेमवारी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. परिणामी, दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत असून, लातूर, धाराशिव व कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढलेला आहे.
औराद शहाजानी परिसरात एप्रिल महिन्याच्या सुरुवातील ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मध्यंतरी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. परिणामी, तापमानात घसरण झाली होती, तर सोमवारी यात वाढ होऊन ४३ अंशांची नोंद औराद शहाजानी येथील केंद्रावर झाली आहे. याशिवाय परिसरातील सर्वच साठवण तलावातील पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून, मांजरा व तेरणा नदी कोरडी पडली आहे. नदीवरील दहा बंधारे व लघु साठवण तलाव कोरडेठाक पडले असून, अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे.