औरंगाबाद जिल्ह्यातील कृष्णापूर वाडी येथील राहुल बहुरे हे दोन वर्षांपासून औसा येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुन्ह्याच्या तपासाचे काम चांगल्या प्रकारे करून अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आणल्यामुळे व उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बहुरे हे सन २०११ मध्ये राज्य पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांची प्रथम नेमणूक नरसी नामदेव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून झाली. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील पूर्णा, गंगाखेड, औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यात सेवा केल्यानंतर त्यांची लातूर जिल्ह्यात पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे.
औसा तालुक्यातील कोळेवाडी येथे भावाने चुलत भावाचा खून केला होता. या प्रकरणातील गुन्ह्याचा तपास सपोनि. बहुरे यांनी एक वर्षात पूर्ण केला. विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हते. तरीही परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून लातूरच्या सत्र न्यायालयात सादर केले होते. त्याआधारे न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या तपासाबद्दल न्यायालयाने तपासी अंमलदारांची प्रशंसा केली होती. तसेच चोरीच्या गुन्ह्याचा तपास, महिलांविरुद्धचे गुन्हे, बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील तपास, गंभीर व क्लिष्ट गुन्ह्यातील तपासाची आजपर्यंतची त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे.
सोबत पासपोर्ट फोटो
१२एलएचपी औसा राहुल बहुरे