लातूर : अन्न पदार्थांचे पचन होण्यासाठी व्यवस्थित चावून खाणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दात चांगले असणे गरजेचे असते. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि मुलांमध्ये गोड, चिकट पदार्थांचे आकर्षण असल्याने दंतरोगही वाढत आहेत. परिणामी, बालकांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५ हजार ९५६ मुलांमध्ये दातांचे आजार आढळून आले आहेत.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. तपासणीसाठी जिल्ह्यात एकूण ३० वैद्यकीय पथके आहेत. या पथकामार्फत अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनदा तर शाळेतील मुलांची वर्षातून एकदा तपासणी करण्यात येते. तपासणीदरम्यान, आजार आढळून आल्यास औषधोपचार करण्यात येतात. तसेच उपचारासाठी संदर्भित करण्यात येते. त्यामुळे गोरगरिब कुटुंबास मोठा आधार मिळत आहे.
५ हजार बालकांवर मोफत उपचार...राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षभराच्या कालावधीत ३ लाख ७७ हजार ३५२ मुलांची तपासणी करण्यात आली. त्यात ५ हजार ९५६ बालकांमध्ये दंतरोग आढळून आला आहे. त्यातील ५ हजार ७५ मुलांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. दंतरोगात दात किडणे, दात पिवळे पडणे, नवीन दात येणे परंतु, दुधाचा दात तसाच राहणे असे आजार आहेत. विशेषत: दात किडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
शासकीय रुग्णालयात मोफत उपचार सुविधा...जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यात ११ ग्रामीण रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय आहे. तिथे दंतरोग तज्ज्ञ असून आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध आहे. त्यामुळे तिथे मोफत उपचार करण्यात येत आहेत.
दातामुळे चेहऱ्याची ठेवण आकर्षक...दात हे अन्न चावण्याबरोबर व्यवस्थित बोलण्यासाठीही महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर दातांमुळे चेहऱ्याची ठेवणही आकर्षक दिसते. त्यामुळे दातांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे दंतरोगतज्ज्ञ डॉ. चेतन चावरे यांनी सांगितले.
कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा...दात चांगले राहण्यासाठी मुलांनी चॉकलेट खाणे टाळावे. रात्री झोपताना गोड पदार्थ खाऊ नयेत. तसेच सकाळी आणि रात्री ब्रश करावा. कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा.- डॉ. अशोक सारडा, निवासी वैद्यकीय अधिकारी.
चॉकलेट, पिझ्झा, गोड पदार्थ टाळावेत...चॉकलेट, पिझ्झा अशा गोड आणि चिकट पदार्थांमुळे मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. दातांना खड्डा पडतो आणि कीड लागते. त्यामुळे लवकर उपचार घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने दिवसातून दोनदा ब्रश करावा. पौष्टिक आहार घ्यावा. -डॉ. चेतन चावरे, दंतरोगतज्ज्ञ.