लातूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव मोहिमेस बुधवारपासून प्रारंभ झाला असून जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते झाले. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेतली.
तालुक्यातील भातांगळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमास आरोग्य उपसंचालिका डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एच. व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. नितीन बोडके, डॉ. तांबारे, डॉ. श्रीधर पाठक आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. अर्चना भोसले म्हणाल्या, अवयवदानाची चळवळ व्यापक करावी. वेळेत सर्व आजारांचे निदान झाल्यास समाज सुदृढ होईल. डॉ. प्रदीप ढेले म्हणाले, सध्या कर्करोग, असंसर्गिक आजार वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी लवकर निदान व उपचार आवश्यक आहेत. प्रास्ताविक डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी केले.
मोहिमेत गावे क्षयमुक्त करावीत...नागरिकांनी आयुष्मान भव मोहिमेचा लाभ घ्यावा. समाजातील सर्व घटकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करावी. या मोहिमेतून गावे क्षयरोगासारख्या आजारातून मुक्त करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले.
यावेळी आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, अवयवदान, क्षयरोग निदान, असंसर्गिक आजाराबद्दल विविध जाणीव जागृती स्टॉल व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात आयुष्मान कार्ड, क्षयरोग रुग्णांना मोफत आहाराची मदत करणारे निक्षय मित्र, क्षयरोगावर मात करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.