रेणापूर : तालुक्यातील पानगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी अस्थी दर्शनासाठी बुधवारी लाखोंचा जनसागर उसळला होता. यावेळी जय भीम...जय भीम... या घोषणांनी पानगाव पंचक्रोषी परिसर दणाणून गेला होता. रात्री १२ वाजेपासूनच अभिवादनला अनूयायांनी गर्दी केली होती. ६ डिसेंबरच्या पहिल्या मिनिटांत पुष्पचक्र अर्पण करुन अनुयायांनी पंचशील त्रिशरण ग्रहण केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, माजी सनदी अधिकारी भा.ई. नगराळे, रेणापूरच्या तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती.
पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ध्वजवंदन करण्यात आले. दिवसभर आंबेडकरी अनूयायांची अभिवादनसाठी गर्दी होती. वेगवेगळ्या सेवाभावी संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी मदत कार्यासाठी स्टॉल्स लावले होते. यावेळी व्ही.के. आचार्य, नामदेव आचार्य, सुर्यभान आचार्य, दशरथ आचार्य, विष्णु आचार्य, गोरोबा आचार्य, किशोर आचार्य, जे.सी. पानगावकर, सुभाष आचार्य, किशोर आचार्य, तुकाराम कांबळे, गौतम गोडबोले, नारायण आचार्य, नागनाथ चव्हाण, रत्नराज आचार्य यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादनासाठी गैरसोय हाेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली होती. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांनी अभिवादन केले. यावेळी राजकीय, सामाजिक, शासकीय अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पानगाव येथे जमले होते.
अभिवादनासाठी अनुयायांच्या रांगाअभिवादनासाठी अनुयायांच्या रांगा लागल्या होत्या. मोफत अन्नधान्याचे स्टॉल्स लावण्यात आले होते. आंबेडकरी साहित्याचे ॲडीओ, व्हिडीओ साहित्य उपलब्ध होते. पुस्तकांचीही मोठी विक्री झाली असल्याचे स्टॉलधारकांनी सांगितले.
पोलिसांकडून चोख बंदोबस्तअभिवादनासाठी लातूरसह परिसरातील तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यातील अनुयायी अभिवादनासाठी आले होते. त्यामुळे पानगाव येथे मोठी गर्दी झाली होती. बाहेरगावाहून आलेल्या अनुयायांना अभिवादन करणे सोयीचे जावे म्हणून पोलिसांनी मदत केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ९ अधिकारी, १४० होमगार्ड, ६० पोलीस कर्मचारी, दोन आरसीपी तुकड्या, दोन एसआरपी सेक्शन असा मोठा बंदोबस्त होता.