लातूर: राज्यातील सत्ता नाट्यात अजित पवार यांनी शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील राजभवनावर उपस्थित होते. मात्र बाबासाहेब पाटील यांनी सायंकाळी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.
राजभवनावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवारांबरोबर बाबासाहेब पाटील दिसले होते. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता पाटील यांनी राजभवनावर उपस्थित असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी अधिक भाष्य टाळले. तर उदगीर विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार संजय बनसोडे यांनी आपण नेते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.
संजय बनसोडे हे अजित पवारांसोबत आहेत आणि ते शपथविधीनंतर गायब झालेत, अशी चर्चा सकाळपासून होती. त्यांना मुंबईबाहेर नेलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं. एकेक आमदार जपण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीनं सर्वस्व पणाला लावलेलं असताना, संजय बनसोडे हे एअरपोर्टजवळच्या सहार हॉटेलमध्ये असल्याची कुणकुण शिवसेनेला लागली. त्यांच्या नेत्यांनी तात्काळ हॉटेल गाठलं आणि तिथून संजय बनसोडे यांना घेऊन ते थेट चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले. त्यांच्या या 'पकडापकडी'ची सुरस चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.