- महेश पाळणे
लातूर : आपल्याप्रमाणे आपला मुलगा क्रीडा क्षेत्रात निपून व्हावा म्हणून क्रीडाप्रेमी पालक धडपडत असतात़ मुलाला अगदी बालपणापासूनच क्रीडा स्पर्धेतील डाव, प्रतिस्पर्ध्यांवर विजय कसा मिळवावा याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देत असतात़ बहुतांश वेळा मुलांसाठी पालकच प्रशिक्षक ठरत असल्याचे आपण नेहमीच पाहतो़ मात्र, बाप-लेक एकाच स्पर्धेत एकत्र येण्याचा योग लातूरातील राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आला आहे़ त्यामुळे हा विषय बॅडमिंटन विश्वात चर्चिला जात आहे़
लातुरात ज्येष्ठांच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा सुरु असून, दोनशेहून अधिक स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. दयानंद बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा सुरु असून, या स्पर्धेत एक अनोखा योग पहावयास मिळत आहे़ आणि तो म्हणजे पिता-पुत्रांचा या स्पर्धेत असलेला एकत्र सहभाग़ ६६ वर्षाचे असणारे मुंबईचे नेरॉय डिसा ६५ ते ७० वयोगटात प्रतिनिधित्व करीत असून त्यांचा मुलगा ३६ वर्षाचा निसाल डिसा ३५ ते ४० वयोगटात आपले नशीब अजमावत आहे़ एखाद्या स्पर्धेत बाप-लेक एकत्र खेळण्याचा हा दुर्मिळ योग लातूरकरांना पहायला मिळत आहे़ या स्पर्धेत एकूण सात वयोगट असून, ३५ ते ७० वयापर्यंतचे खेळाडू यात सहभागी झाले आहेत़ पिता-पुत्राच्या सहभागाची चर्चा क्रीडा वर्तुळात झाली असून, त्यांचे कौतुक होत आहे़ वडील नेरॉय ३५ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले असून, आशियाई स्पर्धेत त्यांनी चार वेळेस भारताला पदके पटकावून दिली आहे़ हा त्यांचा विक्रम आजही अबाधित आहे़ यासह अनेकवेळा त्यांनी वरिष्ठ गटात राज्याला सुवर्णपदक मिळवून दिले आहे़ यासह १७ वेळेस दुहेरीत अंतिम फेरी गाठली आहे़ बॅडमिंटनपटू प्रकाश पादूकोन यांच्यासोबतही त्यांनी बॅडमिंटन सामना खेळला आहे़ यासह आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांचे प्रशिक्षक म्हणूनही भुमिका बजावली आहे़ तर मुलगा निसालने अनेक राज्यस्पर्धेत सुवर्णपदकासह रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली आहे़ अशा या बॅडमिंटन स्टार पिता-पुत्रांची चर्चा या स्पर्धेमुळे लातुरात होत आहे़ यांच्याकडे पाहून प्रेक्षकही ‘कमाल की जोडी’ म्हणत आहेत़
एकत्र खेळण्याचा आनंद़़आम्ही पिता-पुत्र बॅडमिंटन खेळाचा पूर्णपणे आनंद घेतो़ खेळ हाच आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे़ त्यामुळे आनंद आहे़ स्पर्धेत एकत्र येण्याचा हा योग आला असून, मुलगा निसालसह या राज्यस्पर्धेत खेळण्याचा आम्ही दोघेही एकत्र आनंद घेत असल्याचे पिता नेरॉय डिसा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़