लातूर : खरीप हंगामासाठी खर्च कमी व्हावा, तसेच शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या घरगुती बियाणांचा वापर करावा म्हणून कृषी विभागाच्यावतीने गेल्या दोन-तीन वर्षांपासून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. यंदाच्या खरिपासाठी सोयाबीनचे ३ लाख ६७ हजार ५०० क्विंटल बियाणे आवश्यक आहे. सध्या शेतकऱ्यांकडे २ लाख ३८ हजार ८७५ क्विंटल पेक्षा अधिक बियाणे उपलब्ध असल्याने शेतकरीच बियाणे बँक ठरत आहेत.
जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ५ लाख ९९ हजार ९०० हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक पेरा नगदी पीक असलेल्या सोयाबीनचा होतो. जवळपास ४ लाख ९० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवून त्यादृष्टीने नियोजन केले आहे. त्यापाठोपाठ तुरीचा ९० हजार हेक्टरवर पेरा होणे अपेक्षित आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणांची मदार ही विविध बियाणे कंपन्यांवर होती. मात्र, तीन- चार वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात कंपनीचे बियाणेही उगवले नसल्याच्या तक्रारी झाल्या. परिणामी, कृषी विभागाने घरगुती बियाणांच्या वापराकडे लक्ष केंद्रित केले.
सोयाबीनच्या घरगुती बियाणांचा वापर वाढावा. तसेच शेतकऱ्यांची बियाण्यांसाठीच्या होणाऱ्या खर्चात काही प्रमाणात बचत व्हावी म्हणून गेल्या दोन- तीन वर्षांपासून कृषी विभागाने गावोगावी- शेती बांधावर जाऊन बीज प्रक्रिया करून घरगुती बियाणांचा वापर करण्याबाबत जनजागृती केली. त्यामुळे घरगुती सोयाबीन बियाणांचा वापर वाढला आहे.
२ लाख ३८ हजार क्विंटल घरगुती बियाणे...जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा ४ लाख ९० हजार हेक्टरवर होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ३ लाख ६७ हजार ५०० क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. दरम्यान, काही शेतकरी बियाणे बदल करतात म्हणून कृषी विभागाने शासनाकडे विविध कंपन्यांच्या १ लाख २८ हजार ६२५ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. उर्वरित २ लाख ३८ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाणे हे घरगुती वापरले जाणार आहे.
तुरीचा पेरा ९० हजार हेक्टरवर...सोयाबीनपाठोपाठ तुरीचे उत्पादन घेतले जाते. यंदा ९० हजार हेक्टरवर तुरीचा पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. ज्वारी २० हजार हेक्टर, मूग १० हजार हेक्टर, उडीद पिकाचा ८ हजार हेक्टरवर पेरा होण्याचा अंदाज आहे. तसेच अहमदपूर आणि जळकोट तालुक्यात काही प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. त्यासाठी १३ हजार पॉकेट कापूस बियाणे उपलब्ध झाले आहे.
शेतकऱ्यांनी काळजी करू नये...यंदाच्या खरिपात कुठल्याही बियाणांचा तुटवडा जाणवणार नाही. मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. घरगुती बियाणांचा अधिकाधिक वापर करावा. त्यामुळे आर्थिक फायदाही होईल.- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी.