लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील अनेक जबाबदाऱ्या शासनाने गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर टाकल्या आहेत. याला विरोध दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी राेहयोच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी, जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेली जवळपास १२०० कामे ठप्प असून, या कामावर कार्यरत असलेल्या १३ हजार ५०० मजुरांची गैरसोय सुरू आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती विभागाकडून गावस्तरावर विविध कामे केली जात आहेत. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ११०० कामे सुरू होती. यामध्ये १३ हजार ५०० मजूर कार्यरत होते. परंतु शासनाने रोहयोंतर्गत कामातील जबाबदारीत बदल केले आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील साप्ताहिक हजेरी यापूर्वी रोजगार सेवक करीत होता. त्यावर ग्रामसेवक प्रतिस्वाक्षरी करीत होते. मात्र, आता रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करताना कुशल व अकुशल कामांचे ६०.४० टक्के प्रमाण राखण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून, बीडीओंकडून इतर कामांचा ताण पाहता मजुरांचे मस्टर पडताळणी व इतर कामांमध्ये अधिक देता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या मागण्यांसाठीही बीडीओंनी ग्रामपंचायत स्तरावरील रोहयोच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी, ग्रामपंचायत स्तरावरील कामे बंद आहेत.
या कारणांमुळे कामांवर बहिष्कार...मजुरांच्या उपस्थितीबाबत गटविकास अधिकारी जबाबदार राहणार नाहीत, याबाबत शासन आदेश निर्गमित करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत ग्रामपंचायत स्तरावरील जबाबदारी निश्चित करणे, राज्य स्तरावरून मंजूर करण्यात येत असलेल्या कामांच्या बाबतीत मंजुरीबाबत ६०.४० चे प्रमाण राखण्याबाबत गटविकास अधिकारी जबाबदार राहणार नाहीत, याबाबत आदेश जारी करावा. ग्रामपंचायत स्तरावर यंत्रणा असताना बीडीओंच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्यात येत असून, यासह इतर मागण्यांसाठी बहिष्कार टाकण्यात आला आहे.
आमच्या कुटुंबाचा गाडा कसा चालवावा..?बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना राबविली जाते. त्यानुसार आमच्या हाताला गावातच काम उपलब्ध झाले. मात्र, गटविकास अधिकारी यांनी कामावर बहिष्कार टाकलेला असल्याने मागील काही दिवसांपासून कामे बंद आहेत. त्यामुळे काम केल्यावर मिळणारी मजुरी बंद झाली आहे. हाताला काम नाही, अवकाळीमुळे शेतात पण कामाला कोणी बोलवत नाही. परिणामी, कुटुंबाचा गाडा आम्ही कसा चालवावा, असा सवाल मजुरांमधून उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायत स्तरावर चालतात ही कामे...रोहयो अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर खासगी, सार्वजनिक विहिरींची कामे, मातोश्री पाणंद शेत रस्त्याची कामे, बांधावर वृक्षलागवड, शोषखड्ड्यांची कामे, शेततळे यांसह विविध कामे चालतात. उन्हाळ्यात या कामांना वेग येतो. त्यामुळे अनेकांच्या हाताला रोजगारही मिळतो. मात्र, ही कामे ठप्प असल्याने मजुरांना कामासाठी इतरत्र शोधाशोध करावी लागत आहे. बीडीओ साहेबांचा बहिष्कार कधी संपणार, असा सवालही मजुरांमधून उपस्थित केला जात आहे.