लातूर : काही दिवसांपासून शहरात डेंग्यसदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात बालकांचे अधिक प्रमाण आहे. परिणामी, आरोग्य विभागाचा तापच वाढला असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी गृहभेटीबरोबरच जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. मात्र, प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आरोग्य विभागही बेजार झाले आहे.
यंदा पावसाने ताण दिल्याने जलसाठ्यात अपेक्षित प्रमाणात वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश घरांमध्ये पाण्याचा संचय वाढला आहे. मात्र, हे पाणीसाठे घट्ट झाकून न ठेवणे. तसेच फुलदाणी, फ्रीजच्या ट्रे मधील पाणी नियमितपणे न बदलणे अशा कारणांमुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डेंग्यसृदश्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. सध्या शहरातील खाजगी रुग्णालयात तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ८२२ डेंग्यूसदृश्य आजाराच्या रुग्णांची नोंद झाली आहे.
ताप अंगावर काढू नये...डेंग्यूसदृश्य आजाराचे प्रमाण बालकांमध्ये अधिक आहे. त्यामुळे काळजी घ्यावी. ताप आल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत. तसेच पूर्ण बाह्याचे कपडे वापरावेत. दारे- खिडक्यांना जाळ्या बसवून घ्याव्यात. प्रत्येकाने वैयक्तिक दक्षता घ्यावी.- डॉ. महेश पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा.
संशयित आढळल्यास सर्वेक्षण...डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णाच्या घरी व परिसरातील २०० घरांना भेटी देऊन कंटेनर सर्वेक्षण व ॲबेटिंग मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच धूरफवारणी करण्याबरोबरच स्वच्छतेसंदर्भात सूचना करण्यात येत आहेत, असे मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितले.
रुग्णसंख्येत दररोज वाढ सुरुच...दिनांक - शहर - शहराबाहेरील - एकूण९ सप्टेंबर - ३०३ - ३२० - ६४२१२ रोजी - ३२३ - ३७५ - ७१७१३ रोजी - ३२८ - ३९२ - ७३९१४ रोजी - ३४० - ४३३ - ७७३१५ रोजी - ३५८ - ४५१ - ८०९१६ रोजी - ३६२ - ४६० - ८२२