लातूर : कधीकाळी शिक्षण आणि आरोग्य सेवेला प्राधान्य देणारी स्थानिक स्वराज्य संस्था आता शासनाच्या उपक्रमापूर्ती आरोग्य सेवा देत आहे. गरोदर मातांची नोंदणी, लसीकरण आणि जमलेच तर बाह्य रुग्ण सेवा या पलीकडे लातूर मनपाच्या आरोग्य विभागाची सेवा गोरगरिबांपर्यंत पोहोचत नाही. दरम्यान, तत्कालीन नगरपरिषदेने राबविलेल्या फिरत्या दवाखान्याचाही उपक्रम मनपाने बंद केला आहे.
माजी खा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या संकल्पनेतून लातूर शहरात फिरत्या दवाखान्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. प्रत्येक प्रभागात जाऊन फिरता दवाखान्यातील डॉक्टर रुग्णांना सेवा देत असत. प्रभागनिहाय वेळापत्रक करण्यात आले होते. त्या वेळापत्रकानुसार फिरता दवाखाना संबंधित प्रभागात जात असे. त्या ठिकाणी आलेल्या रुग्णांना सेवा दिली जात होती. माजी खा. डॉ. जनार्दन वाघमारे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही सेवा बंद पडली. कोरोना काळात त्यांच्या फिरत्या दवाखान्याची ॲम्बुलन्स मयत व्यक्तींना स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी शववाहिका म्हणून वापरण्यात आली. आता या मोबाइल दवाखान्याची व्हॅन महापालिकेच्या आवारात धूळखात पडली आहे.
आठ दिवसांआड फिरता दवाखान्याची वाॅर्डात होती सेवा...तत्कालीन नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने फिरत्या दवाखान्याचे वेळापत्रक तयार केले होते. ज्या प्रभागात जी वेळ आणि तारीख आहे, ती तारीख प्रभागातील नागरिकांना कळविली जात असे. विशेष म्हणजे बहुतांश प्रभागातील नागरिकांना या फिरत्या दवाखान्याच्या कामकाजाचे वेळापत्रक पाठ झाले होते. विशेष म्हणजे सेवा घेण्यासाठी रुग्णांचा चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळत होता. त्यामुळे हा उपक्रम कोणी आणि का बंद पडला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोग्य केंद्रांतून बाह्य रुग्ण सेवा असल्याने फिरता दवाखाना बंद...महापालिकेअंतर्गत लातूर शहरात एकूण १६ दवाखाने आहेत. या दवाखान्यातून वेगवेगळ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यक्रम राबविले जातात. तसेच बाह्य रुग्ण सेवा ही दिली जाते नागरी आणि आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच आपला दवाखाना असे मिळून १६ ठिकाणी हे दवाखाने आहेत. त्यामुळे फिरता दवाखाना कशाला म्हणून हा उपक्रम बंद करण्यात आला आहे.
शहरात आणखीन सहा नागरी आरोग्य केंद्र होणारआपला दवाखान्यासह लातूर शहरात १६ आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये आंतररुग्ण सेवा नाही. परंतु बाह्यसेवा आहे. आणखीन सहा नागरिक आरोग्य केंद्र होणार आहेत. डिसेंबर अखेर ही केंद्र सुरू होणार आहेत, असे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.
...........