लातूर: दुचाकी चालकाला अडवून डाेळ्यात मिरची पूड टाकून,मारहाण केल्याची घटना एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडली हाेती. दरम्यान,यावेळी आराेपींनी दुचाकी,माेबाइल हिसकावत पळ काढला हाेता. यातील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेडमधून उचलले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील दुचाकी,माेबाइल जप्त केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत गत दाेन महिन्यापूर्वी अनोळखी गुन्हेगारांनी एका दुचाकीचालकाला अडवत, डोळ्यात मिरची पूड टाकून जबर मारहाण केली हाेती. यावेळी दुचाकी चालकाकडील दुचाकी आणि मोबाइल हिसकावून धूम ठाेकली हाेती. याबाबत एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. आराेपींच्या अटकेचे पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले. या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलावंडे यांच्या पथकाकडून आराेपींचा शाेध घेतला जात हाेता. फिर्यादीकडे याबाबत सखोल विचारपूस केली. पथकाला खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आराेपी हा नांदेड जिल्ह्यात असल्याचे समाेर आले. त्याला नांदेड शहरातून पथकाने उचलले. कमलाकर उर्फ सोनू प्रकाश सोनसळे (२६, रा. नांदेड) असे त्याने आपले नाव सांगितले. अधिक चाैकशी केली असता, त्याने मुस्ताक अली (२२, रा. उत्तर प्रदेश) याच्यासाेबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील मुस्ताक अली याचा पाेलिस शाेध घेत आहेत.
ही कामगिरी अंमलदार अंगद कोतवाड,माधव बिलापट्टे,नवनाथ हासबे,राजेश कंचे,राजू मस्के,तुराब पठाण,जमीर शेख,नकुल पाटील यांच्या पथकाने केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"