लातूर : अर्धवेळ (पार्ट टाईम) नाेकरी करून कमवा ३० ते ५० हजार रुपये, अशा जाहिरातीला भुललेल्या कातपूर येथील एका तरुणाला तिघा परदेशी नागरिकांनी तब्बल १४ लाख ३३ हजार ११० रुपयांना गंडविल्याची घटना समाेर आली आहे. याबाबत विवेकानंद चाैक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, टेलिग्राम ग्रुपमधील सेल्सली काउफोर्ड या ग्रुपवरून बोलणे करून, दरराेज १ ते २ तास काम करा आणि महिना ३० ते ५० हजार रुपये कमवा, अशी जाहिरात सुशील दिलीपराव साळुंके (वय ३३ रा. माऊली अपार्टमेंट, कातपूर राेड, लातूर) यांनी पाहिली. दरम्यान, त्यांनी याच ग्रुपमधील एक लिंक ओपन केली. यावेळी आश्वी अकिरा नाॅमस आणि लेस्ली क्राउफाडे यांनी वेळाेवेळी सुशील साळुंके यांच्याकडून पैशाची मागणी केली. तब्बल १४ लाख ३३ हजार ११० रुपये उकळण्यात आले. ही घटना १४ जानेवारी राेजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडला.
...अन् फसवणूक झाल्याने फुटला घामजवळपास १५ लाख खात्यातील साफ झाल्यानंतर फिर्यादी भानावर आला. आपली फसवणूक झाल्याची त्यांना जाणीव झाली. त्यानंतर मात्र पायाखालची वाळूच सरकली अन् घामही फुटला. याबाबत त्यांनी विवेकानंद चाैक पोलिस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. याबाबत तिघा परदेशी नागरिकांविरोधात गुरनं. १०२ / २०२३ कलम ६६ (डी) आयटी ॲक्ट, कलम ४२०, ३२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर करीत आहेत.