स्थलांतरित पक्षी पोल्ट्रीजवळ नको, खबरदारी घ्या...
जिल्ह्यात ५ हजारांपेक्षा अधिक उत्पादन असणाऱ्या ११० नोंदणीकृत पोल्ट्रीफार्म आहेत. ४ लाख ८७ हजार कोंबड्यांची संख्या आहे. दोन ठिकाणी अंडी उबवून विक्री होते, तर तीन ठिकाणी अंडे उत्पादक सेंटर आहेत. पोल्ट्रीजवळ झाड असू नये, जेणेकरून वेगवेगळे स्थलांतरित पक्षी तेथे येणार नाहीत. पोल्ट्रीच्या बाजूने चुन्याची फकी मारून घ्यावी व पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.डी. पडिले यांनी सांगितले.
२००६ पासून खबरदारी आणि नियमित तपासणी केली जात असल्यामुळे बर्ड फ्लूचा व्हायरस आपल्याकडे नाही. बहुतांश पोल्ट्रीधारक जुने आहेत. त्यामुळे त्यांना कोंबड्यांमध्ये होणाऱ्या आजारांविषयी माहिती आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर ते अधिक खबरदारी घेत आहेत.
पक्षी मृत आढळल्यास तात्काळ कळवा...
जिल्ह्यात केंद्रेवाडी येथे १३३ आणि सुकणी येथे ८० असे एकूण २१३ पक्षी मृत आढळलेले आहेत. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण वेगळे आहे. तरीपण या पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोणत्याही कुक्कुट व्यावसायिकाकडे मृत पक्षी आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.डी. पडिले यांनी केले आहे.