उदगीर (जि. लातूर) : येथील सराईत गुन्हेगारांची टोळी लातूरसह पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी काढले आहेत.
पोलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील भाईगिर, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सामान्यांना त्रास देऊन वेठीस धरणाऱ्या, नागरिकांच्या जीविताला, त्यांच्या मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी हद्दपारीच्या तीन प्रकरणामध्ये दहा सराईत आणि कुख्यात आरोपीविरुद्ध कार्यवाही करत त्यांना लातूरसह पाच जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
या कारवाईसाठी उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, प्रदीप स्वामी, उदगीर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या पथकातील बबन टारपे, गजानन पुल्लेवाड, सतीश पवार, साठे यांनी पुढाकार घेतला आहे.
मराठवाड्यातील या पाच जिल्ह्यातून हद्दपार...उदगीर शहरासह ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या आणि टोळीने राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर शहर, उदगीर ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीमधील तीन गुन्हेगारांना एक वर्षासाठी लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
सराईत गुन्हेगारांवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल...या गुन्हेगारांच्या टोळीचे रेकॉर्ड पाहिले असता, पोलीस ठाणे उदगीर शहर, ग्रामीण ठाण्यात गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, चोरी करताना दुखापत करणे, हल्ला करणे, अतिक्रमण करणे, धमक्या देणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कारवाया करणे, घातक शस्त्राने जबर दुखापत करणे आदी गुन्हे दाखल आहेत.
तिघांना हद्दपार तर चौघांचे घेतले हमीपत्र....या टोळीतील प्रमुख बाबर मोहम्मद सय्यद (वय २८, रा. पेठदरवाजा, उदगीर), अरबाज अजीमुद्दीन सय्यद (वय २३, रा. धनगरबावडी जवळ, उदगीर), सुलतान खुर्शीद शेख (वय २६, रा. बनशेळकी रोड, उदगीर) याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कार्यवाही करून शुक्रवारी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी हद्दपारिचे आदेश काढले आहेत. तसेच या टोळीतील इतर सदस्य नामे मोसिन मतीन शेख (वय २३, राहणार मुसा नगर, उदगीर), एजाज फारूक शेख (वय २३, राहणार मुसा नगर, उदगीर), सोहेल फकीरमिया सय्यद (वय २३, रा. मुसा नगर, उदगीर), साबेर मंजुरखा पठाण (वय २६, रा. पेठ दरवाजा, उदगीर) यांचे जामीनदारानी चांगल्या वर्तणुकीसाठी हमीपत्र घेतले.