लातूर : शेतकरी मोठ्या कष्टानं आपल्या पिकांची काळजी घेत असतो. पोटच्या लेकरांप्रमाणे शेतातील पिकांना जपतो, त्यात ऊस या पिकाची काळजी घेताना पाणी देण्यासाठी त्याची होणारी तारांबळ सर्वांनाच माहिती आहे. ऊस हे पीक पाण्याशिवाय जगू शकत नाही. पण, ऊस हे पीक जगल्यानंतर शेतकऱ्यांच्या आयुष्यातील आर्थिक अडचणींचा भार कमी करते. मात्र, हाती आलेलं पीक अपघाताने गमावावं लागल्याची दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे.
जिल्ह्यातील हलगरा (ता. निलंगा) आणि नागरसोगा (ता. औसा) शिवारातील जवळपास २० एकरावरील उभा ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. या दोन्ही घटना मंगळवारी घडल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हलगरा येथील शेतकरी गोविंद गायकवाड, बालाजी गायकवाड, उमाकांत गायकवाड, अनंत गायकवाड यांचा १५ एकर आणि नागरसोगा येथील काशिनाथ मुसांडे याचा ८ एकरावरील उस जळाला आहे. या घटनेनं परिसरातील शेतकऱ्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तर, गायकवाड कुटुंबीयांवर मोठी निराशा पसरली आहे.