राजकुमार जाेंधळे, लातूर / चाकूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर नांदगाव पाटी येथे बस उलटल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री ८ वाजता घरणीजवळ टेम्पाे उलटल्याची तर ममदापूरपाटी येथे पादचारी चिरडला गेल्याची घटना गडली. महिनाभरात घरणी ते लातूर दरम्यान अपघाताच्या सात घटना घडल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ (ता. चाकूर) परिसरातील भाजीपाला, टाेमॅटाे नागपूर, निजामाबाद, पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठवला जाताे. बुधवारी वडवळ येथील एका शेतकऱ्याने पीकअप टेम्पाेत (एम.एच. २४ ए.यू. ९६७६) १२० कॅरेटमध्ये टाेमॅटाे भरला हाेता. सायंकाळी हा टेम्पाे वडवळ येथून मुंबईच्या दिशेने निघाला. घरणी ओलांडल्यानंतर अवघ्या दाेन किलाेमीटर अंतरावर हा टेम्पाे उलटला. यात चालक माधव देवरे (वय ३५ रा. अहमदपूर) यांच्या पायाला जबर मार लागला. टेम्पाे, टाेमॅटाेचे ३५ हजारांचे नुकसान झाले. रस्त्यावर टाेमॅटाेचा सडा पडला हाेता.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग पाेलिस, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेसीबीच्या सहायाने उलटलेला टेम्पाे बाजूला केला. जवळपास एक तासानंतर महामार्गावरील वाहतूक सुरुळीत झाली. तर ममदापूर पाटीवरील घटनेतील पादचाऱ्याला चिरडले असून, पाेलिस घटनास्थळी पाेहचले आहेत.
ना उड्डाणपूल ना भुयारी मार्ग...
नागपूर-रत्नागिरी महामार्गावर ४ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत घरणी ते आष्टामाेड दरम्यान सात अपघाताच्या घटना घडल्याची नाेंद आहे. नांदगाव पाटी येथे साेमवारी झालेला अपघात पाचवा हाेता. तर बुधवारी रात्री घरणी, ममदापूर येथे दाेन अपघात झाले. घरणी ते आष्टामाेड दरम्यान छाेटी-छाेटी गावे आहेत. स्थानिक वाहनधारक, दुचाकीचालकांची माेठी वर्दळ असते.
महिनाभरापूर्वी डाॅक्टरच्या दुचाकीला कारने उडवले...घरणी ते आष्टामाेड दरम्यान नांदगाव पाटी येथे दुचाकीवरुन लातूरकडे जाणाऱ्या अंबुलगा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. यशवंत गरड यांच्या दुचाकीला लातूरकडे निघालेल्या भरधाव कारने जाेराने उडवले. हा अपघात एवढा भीषण हाेता की, यात डाॅ. गरड हे जागीच ठार झाले.