लातूर : हत्तीरोग हा दुर्लक्षित आजार असून त्याच्या ठराविक वृध्दीनंतर रुग्णांच्या हलचालीवर कमालीची बंधने येतात. त्यामुळे तो मुक्तपणे हिंडू- फिरु शकत नाही. अशा रुग्णांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्याबरोबर राज्यातील हत्तीरोग रुग्णांना लवकरच दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.
हत्तीरोग हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आजार आहे. अशा रुग्णांच्या पायावर सूज येऊन हलचालीवर एका प्रकारचे निर्बंध येतात. इतरांच्या मदतीशिवाय रुग्ण हलचाल करु शकत नाही. पायावर सूज येणे, ताप येणे, पाय लालबुंद होणे, पायाच्या दोन बोटांमध्ये चिखल्या आजाराप्रमाणे जखमा होणे अशी टप्प्याने रुग्णांत लक्षणे दिसून येतात. पायाच्या सूजेवरुन तीव्रता तपासून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांनी दिले आहेत.
निलंगा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण...तालुका - रुग्णलातूर - ३रेणापूर - ४चाकूर - ३०अहमदपूर - ३३जळकोट - ४३उदगीर - ८१देवणी - १२१शिरुर अनं. - ३१निलंगा - २१२औसा - १एकूण - ५५९जिल्ह्यात हत्तीपायाचे ५५९ रुग्ण...
राष्ट्रीय किटकन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५५९ रुग्ण आहेत. त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी रुग्णांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर वेळापत्रकानुसार नजिकच्या शिबिरात आरोग्य तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.
सहा ठिकाणी आरोग्य शिबीर...दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहेत. निलंगा उपजिल्हा रुग्णालयात १९ जून रोजी, अहमदपूर उपजिल्हा रुग्णालयात २१ जून रोजी, उदगीरच्या सामान्य रुग्णालयात १२ व १४ जून रोजी, लातूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात २० जून, रेणापूर ग्रामीण रुग्णालयात २६ जून तर औसा ग्रामीण रुग्णालयात २८ जून रोजी शिबिर होणार आहे.
अर्जासाठी ही कागदपत्रे हवी...सीएससी सेंटरवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी रुग्णास आधार कार्ड, रेशन कार्ड, दोन पासपोर्ट फोटो या कागदपत्रांसह रक्त गट, मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. शिबिरास येताना ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत सोबत आणणे गरजेचे आहे.
रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा...हत्तीपाय रुग्ण हे शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असतात. त्यामुळे राज्य शासनाने दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रमाणपत्रामुळे समाजकल्याण, एसटी बस यासह शासनाच्या अन्य योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी रुग्णांनी शिबिरात आरोग्य तपासणी करुन घ्यावी आणि शासन योजनेचा लाभ घ्यावा.- डॉ. संतोष हिंडोळे, जिल्हा हिवताप अधिकारी.