लातूर : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या गंजगाेलाईच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुण्याहून उदगीरच्या दिशेने निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स धडकल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात अद्याप कुठलीही नाेंद करण्यात आली नाही.
पाेलिसांनी सांगितले, पुणे येथून उदगीरकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स (एम.एच. २४ ए.यू. ३५००) मंगळवारी लातुरात आली. ती गांधी चाैक, मध्यवर्ती बसस्थानकासमाेरुन गंजगाेलाईतून उदगीरकडे जात हाेती. दरम्यान, गंजगाेलाईत आल्यानंतर अचानकपणे मुख्यप्रवेशद्वारावरच ही ट्रॅव्हल्स धडकली. या अपघातात ट्रॅव्हल्सचे माेठे नुकसान झाले आहे. तर ट्रॅव्हल्समधील प्रवासी सुखरुप असल्याची माहिती समाेर आली आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, अद्याप कुठलीही माहिती, नाेंद आपल्याकडे नसल्याचे सांगण्यात आले.
पाेलिसांकडून चाैकशी...मंगळवारी गंजगाेलाईच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडकणाऱ्या ट्रॅव्हल्सची माहिती पाेलिस घेत आहेत. या अपघाताची पाेलिसांकडून चाैकशी सुरु आहे. अद्याप काेणी याबाबत तक्रार देण्यासाठी समाेर आलेला नाही, असे पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे म्हणाले.
ऐतिहासिक आहे गंजगोलाई‘गंज’ हा उर्दू शब्द असून, त्याचा अर्थ बाजारपेठ असा आहे. ‘गोलाई’ म्हणजे गोलाकार. गंजगोलाई म्हणजे गोल आकाराची बाजारपेठ. हैदराबादच्या निजाम राजवटीतील गुलबर्गाचे तत्कालीन सुभेदार राजा इंद्रकर्ण बहादूर यांच्या हस्ते १९१७ मध्ये या गंजगोलाईची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पुढे १९४६ मध्ये नगररचनाकार फायायुजुद्दिन यांनी गंजगोलाई या ऐतिहासिक स्थळाचा सुनियोजित आराखडा तयार केला. हा आराखडा तयार करण्यासाठी देश-विदेशांतील बाजारपेठांचाही त्यांनी विचार केला, त्यानंतर याची उभारणी केली. गंजगोलाईला १६ रस्ते येऊन मिळतात. प्रत्येक रस्त्यावर वेगळी बाजारपेठ, अशी ही गंजगोलाईची अप्रतिम रचना वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. लातूरच्या गेल्या शंभर वर्षांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासाची गंजगोलाई साक्षीदार आहे. इतकंच नव्हे, तर लातूरच्या सामाजिक सलोख्याचं प्रतीक म्हणूनही गंजगोलाई उभी आहे.