लातूर : राज्य कर्मचारी संपकालीन परिस्थितीचा सर्वाधिक फटका विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला बसला आहे. २०० ते २५० च्या आसपास कर्मचारी संपावर असल्याने दैनंदिन कामकाजाला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे महाविद्यालय प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने गट- क तांत्रिक व नर्सिंग पदे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारी सकाळी ११ वाजता मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग-तीन व वर्ग-चार श्रेणीतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात संपावर आहेत. अधिपरिचारिका, प्रयोगशाळा सहायक, औषधनिर्माता या पदांवरील कर्मचारी संपवर असल्याने रुग्णसेवेला अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाकडून संपकालीन परिस्थितीतही रुग्णसेवेला बाधा येऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. महानगरपालिकेकडून काही कर्मचारी महाविद्यालयाच्या सेवेत घेतले आहेत. परंतु, हे मनुष्यबळही अपुरे पडत आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी तात्पुरत्या स्वरूपात रिक्त पदावर कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गट-क तांत्रिक व नरसिंग पदे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत. अधिपरिचारिका, प्रयोगशाळा सहायक व औषधनिर्माता ही पदे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. ही पदभरती नरसिंग व तंत्रज्ञ प्रयोगशाळा व इतर पदांकरिता असून, केवळ संस्थेतील रिक्त पदांकरिता आहे. याचा नियमित अथवा अस्थायीरीत्या भरलेल्या पदाशी कसलाही संबंध नाही, असेही अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
संकेतस्थळावर माहिती उपलब्ध...१९ मार्च रविवारी सकाळी १२ वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता, मानधन, अटी व शर्ती यांची संपूर्ण माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहावे. पदभरतीच्या जाहिरातीमध्ये कोणताही बदल अथवा पदभरती रद्द करण्याची किंवा कोणत्याही वेळी निवड यादी रद्द करण्याचे अधिकार अधिष्ठाता यांनी राखून ठेवले आहेत.
संस्थेतील रिक्त पदांसाठी भरतीपदभरती संस्थेतील केवळ रिक्त पदांकरिता आहे. अधिपरिचारिका, प्रयोगशाळा सहायक व औषधनिर्माता ही रिक्त पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. याचा नियमित अथवा अस्थायीरीत्या भरलेल्या पदाशी कसलाही संबंध नाही.- डॉ. समीर जोशी, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय