लातूर : सराईत गुन्हेगारांची टाेळी लातूरसह नांदेड, धाराशिव आणि परभणी या चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आली आहे. या कारवाईने इतर गुन्हेगारांचे, टाेळ्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत. याबाबतचे आदेश लातूर जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी जारी केले आहेत.
लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या आणि टोळीने राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई पाेलिस अधीक्षक मुंडे यांनी मंगळवारी केली आहे. आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात शांतता कायम राहावी, सराईत गुन्हेगारांकडून कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य घडू नये, यासाठी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांत दहशत निर्माण करणाऱ्या टोळीमधील गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
या टाेळीमध्ये प्रमुख म्हणून ओम प्रकाश तुळशीराम याळे (वय २६), त्याच्या टोळीतील सदस्य ओमकार योगीराज बिरादार (वय २४), महादेव बाबुराव हसनाबादे (वय २२ रा. सर्व रा. पंढरपूर, ता. देवणी जि. लातूर) यांचा समावेश आहे. आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव आणि येणाऱ्या काळात हाेत असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांच्याविराेधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ३१ मार्च २०२३ राेजी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी हद्दपारीचे आदेश जारी केले आहेत. आदेशात नमूद केलेल्या तारखेपासून हे सराईत गुन्हेगार लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. या कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार, उपद्रवी लोकांवर जरब बसून, या तिघा सराईत गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे अन्य गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे.