लातूर : गत चार महिन्यांपूर्वी दुचाकीचालकाला वाटेत अडवून, मारहाण करून माेबाइल हिसकावत पळ काढलेल्या आराेपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात पळविलेला माेबाइल, वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात एकाची दुचाकी अडवून, जबर मारहाण करून माेबाइल पळविल्याप्रकरणी गत चार महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, यातील आराेपींचा शाेध घेण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिले हाेते. त्यानुसार अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, पाेलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आराेपींचा माग काढला. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून एका सुदर्शन अविनाश चव्हाण (वय २३, रा. साेमनाथपूर, ता. उदगीर) याला आष्टामाेड परिसरातून पळविलेला माेबाइल विक्रीचा प्रयत्न करताना ताब्यात घेतले.
यावेळी अधिक चाैकशी केली असता, ताे आणि साथीदार उदय विजय गिरी (वय २०, रा. साेमनाथपूर, ता. उदगीर) याने पायी जाणाऱ्या एकाला मारहाण करून माेबाइल पळविला, अशी पाेलिसांना कबुली दिली. दरम्यान, सुदर्शन चव्हाण याच्याकडून पळविलेला माेबाइल, वापरलेली दुचाकी असा १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याला उदगीर ग्रामीण पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई स्थागुशाचे अंगद काेतवाड, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, माेहन सुरवसे, राजू मस्के, जमीर शेख, नितीन कठारे यांच्या पथकाने केली.