रेणापूर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ व मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पळशी फाटा ते रेणापूर शहरापर्यंत मंगळवारी सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली.
पळशी फाटा येथून मंगळवारी सकाळी दहा वाजता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा तसेच पोलीस हल्ल्याचा निषेध व रेणापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांना पाठिंबा म्हणून रेणापुर शहरापर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली पळशी फाट्याहून छत्रपती संभाजीनगर-लातूर या हायवेवरून खानापूर पाटी, कुंभारी पाटी, निवाडा फाटा, बावची फाटा, पिंपळ फाटा या मार्गाने रेणापुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकापर्यंत पोहचली. येथे उपाेषणास बसलेल्या तरुणांना पाठिंबा देण्यात आली. याप्रसंगी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, आम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, अशा घोषणा करण्यात आल्या.