लातूर : जिल्ह्यातील केंद्रेवाडी येथील ३५० आणि सुकणी येथील ८० कोंबड्या अचानक दगावल्या होत्या. या मृत कोंबड्यांचे प्रत्येकी पाच नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. यात पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, पशु संवर्धन विभागाच्या वतीने सुकणी येथील १६ पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तर केंद्रेवाडी येथील ८ हजार पक्षी नष्ट करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील एका पोल्ट्रीफार्ममधील ३५० पक्षी दगावले. त्यानंतर सुकणी येथील एका धाब्यावर ८० पक्षांचा मृत्यू झाला. मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत दोन दिवसांपुर्वी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तत्पुर्वी पोल्ट्री परिसरातील दहा किमी अंतर प्रभावक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, आता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या पोल्ट्रीमधील पक्षी नष्ट करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.डी. पडिले यांनी सांगितले.
१ किमी परिघातील पक्षी नष्ट करणार... केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनूसार ज्या ठिकाणी पक्षी दगावले आहेत आणि अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याठिकाणच्या एक किमी परिघातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येतात. केंद्रेवाडी येथील पोल्ट्रीमध्ये ८ हजार पक्षी आहेत. ते नष्ट केल्यानंतर एक किमी परिघातील कोंबड्या नष्ट करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
उत्पादकास मिळणार आर्थिक मदत... सहा आठवड्याच्या आतील एका पक्षाला २० रुपये तर सहा आठवड्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक पक्षास ७० रुपये अशी मदत कुकुटपालन व्यावसायिकास दिली जाणार आहे. केंद्रेवाडी येथील बहूतांश पक्षी सहा आठवड्याच्या आतील आहेत. तर सुकणी येथील नष्ट करण्यात आलेले १६ पक्षी सहा आठवडयापेक्षा अधिक वयाचे होते, असेही पशुसंवर्धन अधिकारी पडीले यांनी सांगितले.
वंजारवाडी अहवालाची प्रतीक्षा...उदगीर तालुक्यातील वंजारवाडी येथील ५५ पक्षी दगावले आहेत.या मृत पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्याचा अहवाल बुधवारपर्यंत प्राप्त होईल.