लातूर : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असले तरी या दोघांनाही या प्रकरणाची सत्यता जनतेसमोर येऊ द्यायची नाही, असा आरोप भारिप बहुजन महासंघ, वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे शुक्रवारी पत्रपरिषदेत केला.
अॅड. आंबेडकर म्हणाले, राफेल प्रकरण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे हा विषय सत्ताधारी आणि विरोधकांनी गांभीर्याने घेऊन जनतेसमोर वास्तव माहिती देणे गरजेचे आहे. मात्र दोघेही सत्य माहिती दडवत आहेत. सरकारने ५२० कोटींचे एक विमान १६०० कोटीला घेतले. अनुभव नसलेल्या कंपनीला आॅफसेट कंत्राट देण्यात आले. एक हजार कोटींची व्यवहारात तफावत आहे. एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सुखोई विमान आले असते, त्याचे एक डिव्हिजन झाले असते. शिवाय, स्कॉड्रन उभारले असते. परंतु, केवळ ३६ विमाने सरकारने खरेदी केले. त्याची वास्तवता सरकारकडून सांगितली जात नाही. काँग्रेसलाही सत्यता जनतेसमोर आणायची असती तर त्यांनी संसदीय समितीमार्फत सरकारकडून माहिती घेतली असती. जे की काँग्रेसचे विरोधी पक्षनेते या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीला सरकारने माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र असे न करता खरेदीचा अहवाल संसदीय समितीसमोर ठेवण्याची मागणी काँग्रेस करीत आहे. ९० दिवसांवर आता लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे हा विषय संसदीय समितीसमोर आणला तर त्याचे आॅडिट ९० दिवसांत पूर्ण होऊ शकत नाही. समितीसमोर विषय आणून उपयोगाचे नाही. कायद्याने राज्यसभेतही हा विषय घेता येत नाही, त्यावर संसदीय समितीनेच खरेदीचा अहवाल सरकारकडून मागविला असता तर सगळीच माहिती समोर आली असती. परंतु, काँग्रेसलाही हे होऊ द्यायचे नाही, असाही आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
बोफोर्स प्रकरणात गनबद्दल शंका नव्हती आणि आता राफेल प्रकरणात विमानाच्या क्वालिटीबद्दल आक्षेप नाही. बोफोर्स प्रकरण करप्शनचा प्रश्न होता. तर राफेल खरेदी प्रकरण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. सुरक्षा मजबूत असली पाहिजे. पण सरकारच्या या भूमिकेमुळे एअरफोर्सची एक विंग कमकुवत होत आहे, असा आरोपही अॅड. आंबेडकर यांनी केला.
पत्रपरिषदेला प्रा. सुभाष भिंगे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, माणिक करवंजे, सचिन लामतुरे आदींची उपस्थिती होती.