लातूर: भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यात संपर्क ते समर्थन अभियान राबविण्यात येत असून आपण व्यक्तिशः ३५ लोकसभा मतदारसंघात ४७ हजार लोकांची भेट घेतली आहे. त्यातील १६ लोकसभा मतदारसंघ सोडले तर बाकीच्या सर्वांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्थन आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपचे ४५ प्लस खासदार असतील,असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे मंगळवारी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातूर आणि अहमदपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या साडेनऊ वर्षात विकासाभिमुख उपक्रम राबविण्यात आले आहेत. विश्वकर्मा योजनेतून गावगाड्यातील सामान्यांना न्याय दिला जात आहे. या योजना सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संपर्क ते समर्थन अभियान राबविले जात आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात सहाशे लोकांची टीम करण्यात आली असून साडेतीन लाख लोकांच्या घरी भेट देण्याचा संकल्प आहे. त्यामुळे मागच्या पेक्षा यावेळी जास्त मतदान पडेल. ५१ टक्के मतदान लोकसभेला भाजपला मिळेल, असेही ते म्हणाले. पत्र परिषदेला माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे,आ. रमेश कराड, माजी आ.सुधाकर भालेराव, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांची उपस्थिती होती.
२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री...भाजपाला देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीला अजित पवार आणि शिवसेनेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. यात काहीही गैर नाही. पण २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. त्यानंतर मुख्यमंत्री कोणी याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र विचार विनिमय करून घेतील, असेही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.
संजय राऊत यांना नितेश राणे उत्तर देतील....तीन राज्यात भाजपला यश मिळाले. मात्र मतदारांशी कृतज्ञता व्यक्त केली नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला, असे विचारले असता बावनकुळे म्हणाले संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर आमच्या पक्षाचे प्रवक्ते नितेश राणे देणार आहेत.