लातूर : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, या मागणीसाठी लातुरात भाजपचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून, दुसऱ्या दिवशी मंगळवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोघा आंदोलनकर्त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, शासनाचा निषेध नोंदवीत भाजपच्या २१ कार्यकर्त्यांनी मुंडन केले. माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात १२७ शेतकऱ्यांनी ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांपैकी दोन शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवावे लागले.
दरम्यान, आंदोलनस्थळी विविध संघटना पाठिंब्यासाठी जिल्हाभरातून येत आहेत. नुकसान झालेल्या सोयाबीनच्या पेंढ्या आणून आपले समर्थन दर्शवीत आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड, खा.सुधाकर शृंगारे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, देवणी तालुक्यातील काशिनाथ गरिबे आणि निलंगा तालुक्यातील मदनसुरीचे मुरलीधर सूर्यवंशी यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. शेतकरी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित सरसकट मदत जाहीर न केल्यास, उद्भवणाऱ्या उद्रेकाला संवेदनहीन सरकार जबाबदार असेल, असा इशाराही माजी मंत्री निलंगेकर यांनी दिला.
केंद्रीय मंत्र्यांचे आंदोलनाला समर्थन-
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आंदोलनाला समर्थन दर्शविले आहे, तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा.डॉ.प्रीतम मुंडे, आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासह माजी मंत्री, खासदार व आमदारांनी आंदोलनाला पाठिंबा देत राज्य सरकारने विनाविलंब सरसकट मदत जाहीर करावी, अशी भूमिका मांडली आहे, तसेच निलंगा तालुक्यातील निटूर येथील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून सरकारचा निषेध नोंदविला.