लातूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंगळवारी लातुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा आरक्षणासाठी काळे झेंडे दाखविण्यात आले. एक मराठा, लाख मराठा, बावनकुळे परत जा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पक्षाच्या कामकाजानिमित्त मंगळवारी लातूर दौऱ्यावर होते. लातूर विमानतळावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी ते थांबले होते. यावेळी अचानक मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी घोषणा देत बावनकुळे यांना काळे झेंडे दाखविले. एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, बावनकुळे परत जा, बावनकुळे परत जा अशा घोषणा सुरू झाल्या. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून २० ते २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
बावनकुळे यांच्या दौऱ्यानिमित्त मोठा पोलिस बंदोबस्त होता. छत्रपती शिवाजी महाराज चाैकात कार्यकर्त्यांनी त्यांना झेंडे दाखवताच पोलिस पुढे सरसावले. त्यांनी तत्काळ काळे झेंडे दाखवणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर बावनकुळे अहमदपूरकडे रवाना झाले. दुपारनंतर त्यांचा कार्यक्रम लातूरमध्ये होता. यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बावनकुळे यांचा दौरा संपेपर्यंत ताब्यात घेतलेल्या तरुणांना नजर कैदेत ठेवले होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.