लातूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना लातुरात गुरुवारी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक अंबाजोगाई रोडवरील अतिथी सभागृहात होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या लातुरात आल्या होत्या. सभागृहाकडे त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना वाटेत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवले. मराठा समाजाला आरक्षण मिळत कसे नाही, मिळालेच पाहिजे अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. शिवाजी नगर पोलिसांनी तात्काळ काळे झेंडे दाखवणाऱ्या आठ ते दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम होते. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रम स्थळी या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त वाढविला होता. बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. बैठकीसाठी सभागृहात विचारपूस केल्यानंतरच प्रवेश देण्यात आला. पक्षाचे दोन गट पडल्यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होती.