लातूर : पवित्र रमजान महिन्यात रोजाची (उपवास) सुरूवात पहाटेच्या सहेर (जेवण) करून होते. मात्र, ज्यांचं लातुरात घर नाही, जे शाळा, महाविद्यालयात शिकताहेत, वसतिगृहातील विद्यार्थी, ज्यांना सहेरची व्यवस्था नाही, अशा जवळपास ८०० रोजाधारकांना मोफत घरपोच डबा पुरविण्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून लातूरच्या उस्मानपुरा येथील युवक करीत आहेत. रमजान महिन्यात पुण्य कमविण्यासाठी त्यांची ही धडपड रात्री ८ ते पहाटे ४ पर्यंत सुरू असते.
भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, आजारी, गरजवंतांना मदत करावी, अशी कुरआनची शिकवण आहे. लोभ, व्याभिचार, अहंकार, अंधविश्वास आदींपासून दूर राहण्यासह अहिंसा, करूणा, शिक्षणाची संगत वाढविण्याची शिकवण दिली जाते. हा महिना वर्षभराचा मार्गदर्शक महिना आहे. त्यामुळे ईश्वराची कृपा व्हावी म्हणून कुरआन, नमाज पठण, रोजा केला जातो. अशा वेळी कुणीही उपाशीपोटी रोजा करणार नाही, याची काळजी घेतली जाते. शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूर शहरात बाहेरगावाहून हजारो विद्यार्थी राहतात. यातील उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांना पहाटे ३ ते ४ या वेळेत घरपोच डबे दिले जात आहेत.
सव्वा क्विंटल तांदुळ, बाराशे चपाती...उस्मानपुरा येथील टेक मस्जिद येथे दररोज जवळपास सव्वा ते दीड क्विंटल राईस, १२०० ते १५०० चपाती, पातळ आणि सुकी भाजी तयार केली जाते. सेवा म्हणून काम करणारे लहान मोठे दीडशे सेवेकरी डबे पॅकिंग करण्याचे काम करतात. दररोज वेगवेगळ्या भाज्या, फोडणीचा भात दिला जातो. यासाठी रात्री ८ वाजेपासून ते पहाटे ४ वाजेपर्यंत जवळपास १५० सेवेकरी काम करतात.
सहा वर्षांपासून केली जाते सेवा...उस्मानपुरा ग्रुपचे रिजवान शेख, अलीम शेख, आशपाक शेख, टिपू शेख म्हणाले, केवळ सेवा म्हणून आम्ही जवळपास दीडशे ते दोनशे तरूणांनी एकत्रित येऊन हा उपक्रम हाती घेतला आहे. पुण्य कमाविण्याठी आम्ही सर्वजण आपापल्या परीने पैसे देतो. कोणी मजूर, कोणी मेकॅनिक, बांधकाम मिस्त्री, आचारी, हातगाडेवाला तर कुणी खाजगी नोकरी, व्यवसाय करतो. शिवाय, गल्लीतल्या महिलांचा यात मोलाचा वाटा आहे. जवळपास ११० घरातून दररोज एक ते दीड हजार चपाती पाठविली जाते. भाजी, भात मस्जिदमध्ये बनविला जातो. त्यानंतर डबे भरण्याचे काम लहान थोर मंडळी करीत असतात.
१५ ते २० जणांची दुचाकीवर फेरी...पहाटे ३ वाजेपासून १५ ते २० तरूण त्यांना ठरवून दिलेल्या मार्गावर डबे घेऊन जातात. उस्मानपुरा मस्जिद येथे रात्री ८ वाजेपासून स्वयंपाकाची तयारी केली जाते. इथे हजर असलेले स्वंयसेवक हाती पडेल ते काम अगदी उत्साहाने करतात. डबे वाटप पूर्ण झाले की इथे येणाऱ्यांनाही जेवण दिले जाते. मस्जिदमध्ये जवळपास २०० जण दररोज सहेर करतात.