रेणापूर : तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात यावा. अतिवृष्टी झालेल्या १२ गावांतील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात याव, या मागणीसाठी किसान सेना व शेतकऱ्यांच्या वतीने बुधवारी येथील पीकविमा कंपनी कार्यालयाला टाळे ठोकून तहसील कार्यालयसमोरील रस्त्यावर अर्धा तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले. पीकविमा कंपनीच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
गत खरीपात तालुक्यात सतत अतिवृष्टी, ढगफुटी झाली. तसेच यल्लो मोझॅक, गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. पीकविमा कंपनी व कृषी विभागाने पंचनामे केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पीक नुकसान भरपाईचे दावे सादर केले. तसेच तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद दाखविण्यात आली.
तद्नंतर अंतिम पीक आणेवारी ४८ टक्के जाहीर करण्यात आली. त्यानुसार ८० टक्के पीकविमा भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजारांपर्यंत सरसकट पीकविमा देण्यात यावा. तसेच ज्यांनी ऑनलाईन तक्रार करूनही पंचनामे झाले नाहीत, तसेच पैसेही मिळाले नाहीत, अशांच्या खात्यावर तात्काळ पीकविमा जमा करावा. तालुक्यातील १२ गावांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नुकसानीपोटी अनुदान जाहीर झाले. परंतु, ते अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. ते देण्यात यावे, या मागणीसाठी किसान सेनेच्या वतीने बुधवारी येथील पीकविमा कार्यालयाला कुलूप लावण्यात आले. त्यानंतर येथील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोंळगे, राजकुमार नागरगोजे, उमाकांत गोडभरले, दिलीप बरुरे, अप्पा बरूरे, बालाजी बरुरे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.