रेणापूर (जि. लातूर) : सगेसायरे अधिसूचनेची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीत पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी सकाळी लातूर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील महापूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तब्बल अडीच तास सुरु होते.
सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी ८ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. गुरुवारी उपोषणाचा सहावा दिवस आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाजाने एकत्र येऊन लातूर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील महापूर पाटीवर आंदोलनास सुरुवात केली. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन जवळपास अडीच तास सुरु होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूने जवळपास तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.