राजकुमार जाेंधळे / लातूर : ‘माझ्या जागेवर का झाेपलास असा जाब विचारत भंगार गाेळा करणाऱ्या आराेपीने नवी मुंबईतील तरुणाच्या डाेक्यात दगड घताला अन् अंथरुण पेटवून दिले. ही घटना रविवारी लातुरातील एकनंबर चाैकात घडली. त्यानंतर तत्परतेने पाेलिसांनी पाच तासातच आराेपीला जेरबंद केले.
पाेलिसांनी सांगितले, गेल्या पंधरा वर्षांपासून फिरून भंगार गाेळा करणारा आराेपी सचिन शिवाजी वाघमारे (रा. बर्दापूर, जि. बीड) दरराेज रात्री एकनंबर चाैकात आसरा घेत हाेता. ताे ज्या जागी झाेपत. त्याच ठिकाणी, नवी मुंबईतील लक्ष्मण सुभाष गजघाटे आला. त्याने आराेपी सचिनला तेथून हुसकावून लावत ताे अंथरुणावर झाेपला. थाेड्यावेळाने सचिन राेजच्या जागेवर पुन्हा आला. तेव्हाही लक्ष्मणला झाेपलेले पाहून आराेपीने लक्ष्मणच्या डाेक्यात चारवेळा दगड घातला. ताे मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर आराेपीने अंथरुणाला पेटवून दिले. त्यामुळे लक्ष्मणचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, पाेलिस पथकामधील सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, खुर्रम काझी, संजय कांबळे, विनोद चलवाड, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, रियाज सौदागर, मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, राहुल कांबळे, चंद्रकांत मुंडे, बंडू निटुरे यांनी आराेपीला जेरबंद केले.
पाच तासात आराेपी अटक...
गुन्ह्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पाेलिसांनी आराेपीला शहरातच पाच तासात अटक केली. त्याच्याकडे मयत तरुणाचा माेबाईल व घड्याळ आढळून आले. घटनाक्रम रुग्णालय आणि नजीकच्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.
नवी मुंबईहून लातुरात बहिणीकडे...
लक्ष्मण गजघाटे नवी मुंबई येथून २४ ऑक्टोबर रोजी लातुरातील बहिणीकडे औषधोपचारासाठी आला होता. पाेलिसांनी सांगितले, तो दारू पीत असल्याने उपचारात अडचणी येत होत्या. ताे २६ ऑक्टाेबर राेजी दुपारी चार वाजता बाहेर जाऊन येतो म्हणून बाहेर पडला हाेता.
गुन्ह्याची पार्श्वभूमी नाही...
गुन्ह्यातील आरोपी व मयत हे एकमेकाला ओळखत नसून त्यांचा आपसामध्ये संबंध नाही. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसून, किरकोळ कारणावरून खून झाल्याचे स्पष्ट आहे. यापूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनाही व्यक्तिगत, किरकाेळ कारणातून झाल्या असून, त्यातील आराेपींना अटक केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पाेलिस यंत्रणा सतर्क आहे. - साेमय मुंडे, जिल्हा पाेलिस अधीक्षक.