लातूर : तुरीचे उत्पादन कमी झाल्याने बाजार समितीत आवकही घटली आहे. त्या तुलनेत मागणी वाढल्याने तुरीच्या दरात वाढ होत आहे. शनिवारी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सर्वसाधारण १२ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला आहे. आगामी काळात आणखीन दरवाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गत खरीप हंगामात उशीरा पाऊस झाल्याने पेरण्यांनाही विलंब झाला होता. जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरपैकी सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. तो ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर होता. तुरीचे क्षेत्र १ लाख १ हजार ७१६ हेक्टर असले तरी प्रत्यक्षात केवळ ६४ हजार ३९६ हेक्टरवर पेरा झाला होता. तो ६३ टक्के असा होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने उत्पादनात घट झाली होती.
कमाल भाव १२ हजार ४२६ रुपयांवर...तारीख - आवक - कमाल - किमान - सर्वसाधारण१८ मे - १३६१ - १२४२६ - ११००० - १२०००१७ मे - २२७४ - १२२५१ - ९८०० - ११८००१६ मे - २१४० - १२३०० - ११७०१ - ११५००१५ मे - १५५२ - ११९०१ - १०९५० - ११०००१४ मे - १७८१ - १२०७७ - ९००० - ११८००१३ मे - १८३४ - १२००० - १०३३४ - ११६००११ मे - १५९२ - ११७०१ - १०९०० - ११२००
एप्रिलपासून दरवाढीस प्रारंभ...लातूरच्या बाजार समितीत जिल्ह्याबरोबर परजिल्ह्यातील आणि कर्नाटक, तेलंगणा राज्यातील शेतमालाची आवक होते. गत खरीपात पेरा घटल्याने आणि कमी पर्जन्यमान झाल्याने उत्पादनातही घट झाली. परिणामी, एप्रिलपासून तुरीच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. १० एप्रिल रोजी कमाल १२ हजार ३१ रुपये तर सर्वसाधारण ११ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता.
उत्पादन कमी झाल्याने दरात वाढ...मागील खरीप हंगामात तुरीचे उत्पादन कमी झाले होते. त्याचबरोबर गत वर्षीच्या खरीपातही पेरा वाढला नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून तूर शिल्लक नाही. दरम्यान, तूर काढणीनंतर बहुतांश शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींमुळे विक्री करण्यास सुरुवात केली. परिणामी, दरात वाढ झाली नाही. आता शेतकऱ्यांजवळी जवळपास ७५ टक्के तूर विक्री झाली आहे. उर्वरित तूर बी- बियाणांसाठी ठेवली आहे. सध्या बाजारात आवक कमी झाल्याने आणि ग्राहक अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे.- नितीन कलंत्री, दाळ उत्पादक.
बाजारात तेजी पण शेतकऱ्यांकडे तूर नाही...परतीचा पाऊस न झाल्याने तूर उत्पादन घटले. सुरुवातीस भावही नव्हता. आता बाजारात तुरीच्या भावात तेजी आली आहे. परंतु, शेतकऱ्यांकडे तूर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.- मुरली बोंडगे, शेतकरी.