समाजातील काही मातांमध्ये आजही स्तनपानासंदर्भात समज-गैरसमज आहेत. आईचे दूध हे नवजात शिशूंसाठी अमृत आहे. मातेच्या दुधामध्ये संरक्षक घटक असल्याने न्यूमोनिया, अतिसार, सर्दी, ॲलर्जी अशा आजारांपासून बाळांचे संरक्षण होते. त्याचबरोबर आई आणि बाळात भावनिक बंध निर्माण होतात. त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत आईच्या दुधाव्यतिरिक्त अन्य दूध देऊ नये. आईचे दूध हे बाळासाठी कवच असते. मातेने बाळाच्या जन्मानंतर अर्ध्या तासात बाळास दूध पाजावे. दूध एका प्रकारचे लसीकरण आहे. जंतू संसर्गापासून संरक्षण होते.
मातेचे दूध हे बाळासाठी नैसर्गिक अन्न आहे. बाळाच्या वाढीसाठीचे सर्व घटक त्यामध्ये असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने भविष्यात काही आजार होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे आईचे दूध हे बाळासाठी पहिला डोस मानला जातो. सुदृढ आरोग्यासाठी स्तनपान महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाळांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असेही बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवप्रसाद मुंदडा, डॉ. इंद्रजित लकडे यांनी सांगितले.
मानसिक स्वास्थ्य चांगले राहते...
मातेस न कळत कोविड झाला असला तरी योग्य काळजी घेऊन बाळास दूध पाजले पाहिजे. तसेच बसून, एकाग्रतेने मातांनी दूध पाजावे. आईच्या दुधामुळे बाळास पूर्ण आहार मिळतो. रोग प्रतिकारशक्ती वाढते. भविष्यात बाळात आजार उद्भवत नाहीत. आई व बाळाचे भावनिक बंध निर्माण होतात. मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.
- डॉ. शिवप्रसाद मुंदडा, बालरोगतज्ज्ञ विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत...
आईचे दूध हे बाळासाठी अमृत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि ती आयुष्यभर राहते. त्यामुळे कोविडसह विषाणूजन्य आजारांवर मात करण्यास मदत होते. तसेच ॲलर्जी होत नाही. आई व बाळ या दोघांचेही मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. बाळाची बुध्दिमता वाढते. सहा महिन्यांपर्यंत आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीही देऊ नये.
- डॉ. इंद्रजित लकडे, बालरोगतज्ज्ञ.