लातूर : परिचर पदावरून सेवानिवृत्त झालेल्या तक्रारदाराचे अर्जित रजेचे रोखीकरण बील, डी.ए. एरियर्स बील व सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे रकमेचे बील काढले म्हणून सात हजारांची लाच घेतल्याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे परिचर या पदावरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे अर्जित रजेचे रोखीकरण बिल, डी.ए. एरियर्स बिल व सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे रकमेचे बिल काढणारे पंचायत समिती, शिरूर अनंतपाळ जि.लातूर येथील वरिष्ठ सहायक संतराम गेमू राठोड (वय ४७ ह.मु. शासकीय कॉलनी, लातूर) यांनी तक्रारदार यांचे वरील काढलेल्या बिलांचा मोबदला म्हणून ८ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीत ७ हजार रूपये देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी वरिष्ठ सहाय्यक संतराम गेमू राठोड यांनी स्वत:च्या कार्यालयात ७ हजार रूपये तडजोडीअंती ठरलेली रक्कम शासकीय पंचासमक्ष लाच स्विकारली.
यावेळी सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह आरोपीस ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ॲन्टी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनात हा सापळा लावण्यात आला.