लातूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने २०१६ ते जुलै २०२१ या कालावधीत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. २०१९ मध्ये सर्वाधिक २४ गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ २०१८ मध्ये २२ आणि २०१६ आणि १७ मध्ये प्रतिवर्ष १९ गुन्हे दाखल आहेत. साडेपाच वर्षांत लाचलुचपतच्या गळाला ११५ मासे लागले आहेत. याप्रकरणी त्या-त्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोना काळातही तब्बल ३१ गुन्हे घडले आहेत.
महसूल विभाग सर्वात पुढे
लाच स्वीकारल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत महसूल विभाग सर्वात पुढे असल्याचे समोर आले आहे.
महसूल विभागानंतर पोलीस दलाचा क्रमांक लागतो. साडेपाच वर्षांत २२ पोलीस अधिकारी, कर्मचारी लाच घेताना अडकले आहेत.
महसूल, पोलीस आणि तिसऱ्या क्रमांकावर पंचायत समितीचा विभाग आहे. यामध्ये दहाजणांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
लोकसेवकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले पाहिजे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. याबाबत वारंवार प्रबोधनही केले जाते. शिवाय, त्या त्या खात्याच्या प्रमुखांकडून सूचनाही दिल्या जातात. असे असतानाही लाच घेण्याचे प्रमाण मात्र थांबत नाही. - माणिक बेद्रे, उपाधीक्षक, एसीबी, लातूर
लाच दोनशेपासून लाखापर्यंत
स्वत:च्या मालकीच्या मालमत्तेची नोंद करून सात-बारा घेण्यासाठी लाच द्यावी लागते. बहुतांश प्रकरणे एसीबीपर्यंत पोहोचत नाहीत. नागरिकांनी तक्रार करावी.
बदलीसाठीही लाचेची मागणी
हवे असलेल्या आणि सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी लाखापर्यंतची लाच मागण्याचे प्रकार घडतात. काही ठिकाणासाठी तर ठराविक लाचेचा आकडा ठरला आहे.