शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील लेंडी नदीवरील पूल पुरात वाहून गेला होता. त्यामुळे ग्रामस्थांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. तालुक्याला जाण्यासाठी १५ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे नाबार्ड अंतर्गत पूल मंजूर करण्यात आला. तूर्तास वाहतूक सुरु व्हावी म्हणून ३२ लाख रुपये खर्चून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
तालुक्यातील घरणी, मांजरा या मोठ्या नद्यांपाठोपाठ दैठणा येथे लेंडी नदी आहे. या नदीवर साकोळ मध्यम प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे दैठणा गावापर्यंत नदीपात्रात बॅकवाॅटर थांबलेले असते. २५ ते ३० वर्षांपूर्वी येथे पाईपचा पूल बांधण्यात आला होता. परंतु, दोन- तीन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात पाईपसह पूल वाहून गेला होता. त्यामुळे दैठणा, शेंद, शंभू उंबरगा आदी गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. जवळपास वर्षभर १५ किलोमीटर अधिकचे अंतर पार करुन तालुक्याला जावे लागत होते. दरम्यान, नाबार्ड अंतर्गत येथे पूल मंजूर करण्यात आला. परंतु, त्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. ग्रामस्थांची सोय व्हावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास ३२ लाख रुपये खर्चून पुन्हा पाईपचा पूल बांधला. मात्र, हा पूल उखडल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
ऊस वाहतुकीस धोका...
सध्या साखर कारखाने सुरु असल्याने दैठणा, शेंद, शंभू उंबरगा आदी गावांतून मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक केली जात आहे. परंतु, पुलावरून जाताना दोन्ही बाजूंनी नालीच्या आकाराचे खड्डे पडले असल्याने ऊस वाहतुकीसाठी पूल अधिकच धोकादायक बनला आहे. नवीन पुलासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, पाईपच्या पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल, असे येथील सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता पवार यांनी सांगितले.