लातूर : भारतीय लाेकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत लातूरच्या नीलेश श्रीकांत गायकवाड यांनी दुसऱ्यांदा भरारी घेतली असून, गतवर्षी ७५२ वा रँक मिळाला होता. तर यंदाच्या परीक्षेत देशात ६२९ वी रँक मिळाली आहे. या यशामुळे लातूरच्या गौरवशाली शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गतवर्षी त्यांची सरंक्षण सहायक नियंत्रकपदी नियुक्ती झाली होती. सध्या प्रशिक्षण सुरू असून, यावर्षी त्यांनी पुन्हा परीक्षा देऊन देशात ६२९ वी रँक मिळविली आहे. आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक आणि एम.टेक झाल्यानंतर त्यांनी बंगलोर येथे एका कंपनीमध्ये सहायोगी कन्सलटंट म्हणून सेवेत असताना कर्तृत्वाच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर ते युपीएससीकडे वळले आणि स्पर्धा परीक्षेत ते यशस्वी झाले.
हेही वाचा - ‘यूपीएससी’त मराठवाडा चमकला; लातूर ५, नांदेड आणि बीडचे ३ तर हिंगोलीचा एकजण यशस्वी
महाविद्यालयीन व शालेय जीवनात त्यांनी विविध स्पर्धांत सहभाग नोंदविला होता. राष्ट्रीय पातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, होमी भाभा वैज्ञानिक परीक्षा, स्वयंअध्ययन, सामान्यज्ञान, गणित विषयातील वेगवेगळ्या स्पर्धेत ते चमकले होते. वडील प्रा.डॉ. श्रीकांत गायकवाड, आई प्रा. अनिता गायकवाड, भाऊ शैलेश व शिक्षकांकडून मिळालेली प्रेरणा आणि मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले असल्याचे नीलेश गायकवाड म्हणाले.
हेही वाचा - मेकॅनिकचा मुलगा बनला जिल्हाधिकारी; अंबाजोगाईच्या किशोरकुमार देवरवाडेचे युपीएससीत यश